कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मसूर येथे पतंगाच्या मांजात अडकलेल्या दोन बुलबुल पक्ष्यांना प्रतीक्षा माने व कुटुंबीयांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे जीवदान मिळाले. मसूर येथील श्री शिवाजी विद्यालयासमोरील प्रतीक्षा माने यांच्या बंगल्याच्या पॅराफिटवरील पत्र्यावर पतंगाच्या धारदार नायलॉन मांजात अडकलेले दोन बुलबुल पक्षी सुटण्यासाठी धडपड करत होते.
त्यांचे पाय पूर्णतः मांजाच्या धाग्यात गुंतले होते. त्यांच्या पंखालाही इजा झाली होती. पत्र्यावरून काहीतरी धडपडत असल्याचा आवाज येत होता. प्रतीक्षाने टेरेसवर जाऊन पाहिले असता दोन पक्षी मांजात अडकून निपचित पडल्याचे दिसून आले. क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही पक्ष्यांना शेजारी पडलेल्या मांजाच्या गुंडीसह हळुवारपणे खाली आणले अन् मांजातून त्यांची सुटका केली.
नंतर प्रतीक्षा व तिच्या आईने पक्ष्यांना पाणी पाजले. पाणी पिल्यावर पक्षी तरतरीत झाले. पंखाची फडफड करू लागले. माने कुटुंबीयांनी हळुवारपणे त्यांच्या पायात व पंखांभोवती अडकलेले धागे कात्रीच्या साहाय्याने पक्ष्यांना इजा न पोहोचता सोडविले.