सातारा प्रतिनिधी । 15 ऑगस्टचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केल्यानंतर सुट्टी असल्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोघं मित्रांनी मस्तपैकी पोहण्याचा प्लॅन केला. थोडं खाल्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बंधाऱ्यावर पोहचले. अंगावरचे कपडे काढून दोघांनी एकामागून एक पाण्यात उड्या टाकल्या आणि दोघांवर काळाने घाला घातला. हि दुर्दैवी घटना सातारा शहरातील जानकर कॉलनी परिसरात घडली. यामध्ये दोघा शाळकरी अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
स्वप्नील सुनील मोरे (वय 15) व अमोल शंकर जांगळे (वय 16, दोघेही रा. जानकर कॉलनी, बोगदा परिसर, सातारा) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमानंतर घरी आलेल्या स्वप्नील मोरे व अमोल जांगळे यांना पोहण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे दोघेही जानकर कॉलनी परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यास गेले होते. दुपारी 12 च्या सुमारास दोघेही पोहण्यास निघून गेले होते. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास ते बुडाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
यानंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या सदस्यांना बोलावण्यात आल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्हीही मुले गरीब कुटुंबातील असून दोघांचेही पालक मजुरीवर जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मुलांना शिकवून मोठे होण्याची स्वप्ने पहात होती. मात्र, स्वातंत्र्यदिनादिवशी या दोन्ही कुटुंबांना दुर्देवी घटनेस सामोरे जावे लागले. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मुलांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.