बिबट्याच्या 2 पिल्लांचे आईसोबत घडले पुनर्मिलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मालखेड येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात बुधवारी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसतोड सुरु असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या सरीमध्ये २ बिबट्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या प्रयत्नानंतर दोन पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात यश आले. याचा सीसीसीटीव्ही व्हीडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालखेड येथील शेतकरी मोरे यांच्या शेत शिवारात बिबट्याची दोन पिल्ले बुधवारी सायंकाळी आढळून आली. यानंतर शेतकरी मोरे यांनी याबाबतची माहिती तत्काळ सरपंच सुरज पाटील व पोलीस पाटील इंद्रजीत ठोंबरे यांना दिली. त्यांनी पुढे कराड वनपाल आनंद जगताप यांना माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन पिल्ले ताब्यात घेतली.

सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास वाईल्ड लाईफ रेस्कुयूअर्स कराड यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पिल्ले सापडलेल्या ठिकाणी विशेष कॅमेरे लाऊन पिल्ले क्रेट मध्ये ठेवण्यात आली. यानंतर रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या सुमारास त्या दोन पिल्लांची आई दोन वेळा पिल्लांजवळ घुटमळून गेली. शेवटी रात्री 11.47 वाजण्याच्या सुमारास पुन्हा आई त्या ठिकाणी आली व दोन्ही पिल्लांना सुखरूप घेऊन गेली. वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्स कराड टीमने यशस्वीपणे पुनर्मिलन घडवून आणले.

सदर कामात वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके आणि चालक हणमंत तर वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमचे रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, अजय महाडीक, रोहीत पवार, सचिन मोहिते, अनिल कोळी या सर्वांनी मोलाची भूमिका पार पाडली.

3 महिन्यात बिबट्या, रानमांजरीसह वाघटीच्या पिल्लांचे पुनर्मिलन

वाईल्ड लाईफ रेस्कुयूअर्स या टीमने गेल्या तीन महिन्यात सहा विविध घटनामध्ये कराड तालुक्यातील विविध ठिकाणी सापडलेली बिबट्या पिल्ले तीनवेळा, वाघटी (रस्टी स्पोटेड कॅट) पिल्ले दोनवेळा, रान मांजर पिल्ले एकदा यांचे त्यांच्या मादी (आई) सोबत यशस्वीपणे पुनर्मिलन घडवले आहे.