सातारा प्रतिनिधी | गोडोलीतील गौरव रेसीडन्सी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आप्पा आपचे (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि अर्शद सत्तार बागवान (रा. शनिवारी पेठ, सातारा), अशी संशयितांची नावे आहेत.
सातारा शहर परिसरातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार साताऱ्याचे डीवायएसपी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका सराईत चोरट्याचे नाव निष्पन्न केले.
सराईत चोरट्यावर विविध जिल्ह्यांमध्ये २५-३० गुन्हे दाखल आहेत. त्याचा निश्चित ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर संशयित चोरटा हा धाराशीव जिल्ह्यामध्ये नातेवाईकांकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. डीबी पथकाने दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात त्याच्यावर पाळत ठेवली. उमरगा तालुक्यातील एका खेडेगावात पहाटे मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले.
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस मिळाली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या आणखी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अनिल जायपत्रे हे अधिक तपास करत आहेत.