सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीदिवशी शेवटच्या एका तासात सातारा आणि कोरेगाव तालुक्यात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटात झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघे जखमी झाले. तसेच कोरेगाव मतदार संघातील भोसे गावात मतदान यंत्रात बीप का वाजत नाही, असं विचारल्यावरून तरूणांच्या दोन गटात राडा झाला.
शेवटच्या तासाभरात दोन ठिकाणी राडा
साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर खा. उदयनराजे समर्थक माजी नगरसेवक वसंत लेवे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थक संजय लेवे यांच्या गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. वसंत लेवे यांच्या डोक्यात रॉड घातला. या हाणामारीत वसंत लेवेंसह एकूण पाच जण जखमी झाले. या राड्यानंतर साताऱ्यात तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कोरेगावात तरूणांचे दोन गट भिडले
कोरेगाव मतदार संघातील भोसे (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रावर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास तरूणांच्या दोन गटात राडा झाला. मतदान यंत्रात बीप का वाजत नाही, अशी विचारणा काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना केली. त्याचवेळी दोन्ही राजकीय गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात मारामारी झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. कोरेगाव पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर राडा करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेण्यात आलं.
संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल : पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे
वसंत लेवे आणि संजय लेवे यांच्या गटात मारामारी झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले होते. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. तक्रार घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. परंतु, आम्हाला आत्ता तक्रार द्यायची नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांनी तक्रार दिली नाही तरी पोलीस स्वत: फिर्याद देतील आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली आहे.