सातारा प्रतिनिधी | कोरेगाव येथील आरफळ कॉलनीनजीक असलेल्या एका शेळ्या- करडांच्या गोट्यास अज्ञातांनी काल रात्री दीडच्या सुमारास आग लावल्यामुळे दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, छप्पर जळून गेले आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की येथील नगरपंचायतीच्या रस्ते दिवाबत्ती विभागातील कर्मचारी ओंकार राजू गायकवाड (रा. अण्णा भाऊ साठेनगर, जुनी पेठ, कोरेगाव) यांचा कोरेगाव- कठापूर रस्त्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या आरफळ कॉलनीनजीक शेळ्या- करडांचा गोठा आहे. काल सायंकाळी श्री. गायकवाड कुटुंबीय शेळ्या- करडांना चारा- पाणी दाखवून आपल्या घरी आले होते.
मात्र, रात्री दीडच्या सुमारास गोटा पेटत असल्याचे गोट्याच्या परिसरातील काही रहिवाशांनी मोबाईल करून श्री. गायकवाड यांना कळवले. ही बाब समजल्यावर तातडीने श्री. गायकवाड व त्यांचे कुटुंबीयांनी रात्रीच आरफळ कॉलनीकडे धाव घेतली. तेथे जाऊन शेजारी व श्री. गायकवाड कुटुंबाने आग विझविली. मात्र, तोवर आगीत दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले.
याबाबत श्री. गायकवाड यांनी दुपारी येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने करत आहेत. दरम्यान, आज सकाळी ही जळिताची घटना सर्वत्र समजल्यावर विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनीही प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत सर्वांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान श्री. गायकवाड यांच्या चार शेळ्यांना काही दिवसांपूर्वी एका उमेदवाराच्या गाडीने ठोकर मारली होती. त्याची भरपाई अद्याप न मिळाल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.