अभ्यासासाठी गेलेल्या दोन मुलींचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात नेल्यावर मृत घोषित करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आशा सेविकेने (Asha Sevika) प्रसंगावधान राखत पाण्यात उडी घेऊन मुलींना बाहेर काढले. त्यातील दोघींना वाचविण्यात त्यांना यश आले. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला असून, शुभांगी सुनील तांबे असे मुलीचा जीव वाचविणाऱ्या या आशा सेविकेचे नाव आहे.

मौजे वाळणे येथे शुभांगी सुनील तांबे या आशा सेविका आहेत. त्यांची मुलगी हर्षदा सुनील तांबे हिच्यासोबत अभ्यास करण्यासाठी रविवारी सकाळी आर्या दीपक नलावडे (वय १२), सृष्टी सुनील नलावडे (वय १३), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२), सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२, सर्व रा. वाळणे, ता. महाबळेश्‍वर) या शुभांगी तांबे यांच्या घरी आल्या होत्या. त्या सर्व मैत्रिणी असल्याने एकत्र अभ्यास करीत होत्या. साडेबाराच्या सुमारास मुलींच्या आवाज ऐकू येत नसल्याने शुभांगी या काय झाले आहे हे पाहण्यासाठी बाहेर आल्या.

त्यावेळी त्यांना घराजवळ असलेल्या धरणाच्या दिशेला मुलींचा आरडाओरडा ऐकू आल्याने त्या धावत आवाजाच्या दिशेन धरणाकडे गेल्या. त्यांना मुली बुडत असल्याचे दिसतात त्यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. बुडत असलेल्या आर्या नलावडे हिला बाहेर काढले व पुन्हा पाण्यात उडी मारून सृष्टी नलावडे हिस बाहेर काढले. त्यानंतर सोनाक्षी सुतार हिस बाहेर काढत आरडाओरडा केला. त्यामुळे धरणात असलेल्या मच्छिमार लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदमला पाण्यातून बाहेर काढले.

यातील सोनाक्षी सुतारचा जागीच मृत्यू झाला, तर सोनाक्षी कदम हिला आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले. सृष्टी नलावडे हिच्यावर तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. आर्या नलावडे ही व्यवस्थित असल्याने घरी आहे. याबाबतची फिर्याद शुभांगी यांनी महाबळेश्‍वर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.