सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत. त्यामधील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड होय. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. या किल्ल्यावर असलेले भवानी मातेचे मंदिर, देवीची मूर्ती अन् मंदिरात बसविले जाणारे दोन घट या मागेही रंजक इतिहास लपला आहे. या गटाडावरील भवानी मातेच्या मंदिरात ३६२ वर्षांपासून दोन घट बसविले जात आहेत. एक घट देवीच्या नावाने तर दुसरा राजाराम महाराज यांनी केलेल्या नवसामुळे. मंदिरात दोन घट बसविणारे हे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे ठरविले. त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे हे हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात गेले. प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून त्यांनी भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली. भवानीमातेची ही मूर्ती अष्टभुजा महिषासूरमर्दिनी रूपातील आहे. ही मूर्ती प्रथम राजगडावर व तेथून प्रतापगडावर आणण्यात आली. १६६१ साली या मूर्तीची प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर किल्ल्यावर नवरात्रोत्सवात घटस्थापनेची परंपरा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी ‘हे हिंदवी स्वराज्य असेच अबाधित राहू दे’ असा नवस भवानी मातेला केला होता. त्यामुळे भवानी मातेच्या मंदिरात ३६२ वर्षांपासून दोन घट बसविले जात आहेत. एक घट देवीच्या नावाने तर दुसरा राजाराम महाराज यांनी केलेल्या नवसामुळे. मंदिरात दोन घट बसविणारे हे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.