सातारा प्रतिनिधी | अनेकवेळा दारू पिताना शाब्दिक कारणांवरून मध्यपींमध्ये वादावादीचे घटना घडत असतात. मात्र, या वादावादीते जीव घेण्यापर्यंत क्वचित घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना वाई तालुक्यात घडली आहे. दारु पिताना झालेल्या चेष्टा मस्करीच्या वादातून दोन मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबारा ते अडीज वाजण्याच्या सुमारास आंबेडकरनगर ( सोनगिरवाडी ) येथील बांभुळवन नावाच्या रिकाम्या जागेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेने वाई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राज अरुणकुमार सिंग (वय २६ वर्षे, श्री. स्वामी समर्थ अपार्टमेंट, ३ रा मजला जगताप हॉस्पीटल जवळ, वाई , मुळ रा. जसवली, ता. महानंदपुर, जि. राज्य- बिहार ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रणित दीपक गायकवाड (वय २५ वर्षे, रा. परखंदी ता. वाई ) व शाकीर शहाबुद्दीन खान (वय २४ वर्षे, रा. निळा कट्टा सोनगिरवाडी, वाई ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी, दि. १८ रोजी रात्री आंबेडकरनगर येथील बांभुळवन नावाच्या रिकाम्या जागेत राज सिंग आणि त्याचे चार मित्र दारू पित बसले होते. यावेळी चेष्टा मस्करीतून झालेल्या वादावादित रागाच्या भरात प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी फुटलेल्या बियरच्या बॉटलने व लाकडी बांबुने राज सिंगच्या डोक्यावर व हातावर अमानुषपणे मारहाण करुन त्याचा खुन केला.
त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले. अन्य दोन मित्रांपैकी एकाने यावेळी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याला देखील मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद राजचा भाऊ अश्विन सिंग याने पोलिसात दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी व त्याच्या सहकार्यानी त्वरित हालचाल करून संशयितांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर करीत आहेत.