स्विफ्ट कारची ओमिनीसह पिकअपला धडक, तिहेरी अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू तर 6 जखमी

0
3824
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूज- दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ भीषण अपघाताची घटना सोमवारी रात्री घडली. या तिहेरी अपघातात दोन जिवलग मित्र जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.

शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार अशी मृत्यू झालेल्या दोन युवकांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी- वडूज रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरानजीक स्विफ्ट गाडी (एचएच 03 डीए 7354) ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता. प्रसाद सुतार यांने निष्काळजीपणाने भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या ओमनीला (एचएच 14 डीएन 2758) पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यानंतर दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या पिकअप गाडीला (एचएच 11 सीएच 3342) समोरुन जोराची धडक दिल्याने मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात शिवम शिंदे व प्रसाद सुतार हे दोघे जागीच ठार झाले, तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौरमोडे (दोन्ही रा. औंध) तसेच पिकअप गाडीमधील लालासाहेब परशुराम पाटोळे, ज्योती लालासाहेब पाटोळे (दोन्ही रा. दरुज) ओमनी गाडीमधील रोहन आप्पासाहेब भिसे व आकाश सोनबा बर्गे (रा. वडूज) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या तिहेरी भीषण अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उपचाराला जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. धनाजी आबाजी सुळे (रा. पिंपळवाडी, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली आहे.

या अपघातातील मृत शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे. दोघेही मित्र होते. दरम्यान, या भीषण अपघातात तिन्ही गाड्यांचे मोठं नुकसान झाले आहे याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.