सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती कि या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. सोमवारी रात्री हि अपघाताची घटना घडली. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाही. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबतअधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून लिंबेगाव हद्दीतून अपघातग्रस्त ट्रक भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने येत होता. हा ट्रक रात्रीच्या सुमारास लिंबेगावजवळ आला असता त्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेली महिला आणि पुरुष खाली पडले. काही कळण्याचा आतच त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे टायर गेले.
या घटनेत पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती घेत अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातात ट्रकमधील एकजण देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.