सातारा प्रतिनिधी । देशात लोकसभा निवडणूक घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. अशात अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या या लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha Election 2024) उमेदवार निश्चिती केल्या जात आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मराठा बांधवांनी बैठक घेत पळसावडे गावातून दोन उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात नुकतीच मराठा बांधवांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी मराठा बांधवांनी अनेक ठराव लेखील मांडले. मराठा आरक्षणाबाबत यावेळी एकमताने भूमिका मांडून ठराव मंजूर केल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र शपथ घेतली. यावेळी मोठ्या संख्येने पळसावडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठा समाजाला जाहीर करण्यात आलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे सांगत मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशात सध्याच्या सरकारने मराठ्यांची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याने याच्या निषेधार्थ अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत. मराठा समाज प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करणार आहे.
मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविला जाणार असून या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या असंख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढणार आहे.
अनामत रक्कम भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाची वर्गणी गोळा केली जाणार
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठीची अनामत रक्कम भरण्यासाठी मराठा कुटुंबांकडून प्रत्येकी शंभर रुपयाची वर्गणी गोळा केली जाणार आहे. अशातच आता साताऱ्यातील माण तालुक्यातील पळसावडे गावातून दोन उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.