कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील बाबरमाची – सदाशिवगड येथे शेतात विहिरी नजीकच्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातनंतर ही घटना घडली. रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोचले. त्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (५०) अशी मृत्यू भावांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाबरमाची-सदाशिवगड येथील तुकाराम खोचरे आणि शहाजी खोचरे यांची शेतजमीन आहे. शेता नजीक त्यांची विहीर असून विहिरीजवळ फ्युजबॉक्स आहे. त्या फ्युजबॉक्समधून विहिरीला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. शेतात काम असल्यामुळे तुकाराम व शहाजी खोचरे दोघेजण दुपारी घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. सायंकाळीही दोघे घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही फोनला प्रतिसाद दिला नाही.
मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही दोघे फोन उचलत नसल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
अखेर सायंकाळनंतर तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी तुकाराम व शहाजी दोघे जण विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या फ्युज बॉक्सनजीक मृतावस्थेत पडल्याचे त्याला दिसले. त्याने तातडीने घटनेची माहिती कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांना दिली.
त्यामुळे ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटीलसह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. तत्पूर्वी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी आले होते. त्यांनी तातडीने विभागातील वीज पुरवठा बंद केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.