साताऱ्यातील दोघांना स्फोटक बाळगल्याप्रकरणी अटक, 4 दिवस कोठडी, स्फोटाचे नमुने पाठवले फॉरेन्सिक लॅबला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील माची पेठ बुधवारी दुपारी भीषण स्फोटाने हादरली होती. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक तपासात या स्फोटामागील कारण समोर आलं आहे. दरम्यान, घटनास्थळावरील नमुने नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.

साताऱ्यातील माची पेठेत बुधवारी झालेला स्फोट हा कॉम्प्रेसरचा नसून तो फटाक्यांच्या दारूमुळे झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला आहे. बेकायदा स्फोटके बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शाहीद हमीद पालकर आणि तबरेज गणी पालकर (रा. गुरुवार परज, सातारा) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे सातारकर भीतीच्या छायेखाली

सातारकरांसाठी बुधवारची दुपार भीतीदायक ठरली होती. भरदुपारी माची पेठेत झालेल्या भीषण स्फोटात चिकन सेंटरसह नजीकची दुकाने उध्दवस्त झाली. मुजमिल हमीद पालकर यांचा स्फोटात जागीच मृत्यू झाला. सुरूवातीला एका दुकानातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एटीएस, बीडीएस, श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आलं. रात्री उशीरापर्यंत घटनास्थळावरील नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले.

स्फोटके बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

फटाक्याची दारू जवळ बाळगून त्याचे आपट बार बनवताना स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळावरून घेतलेले स्फोटकाचे नमुने नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली. याप्रकरणी मृताचे चुलत भाऊ शाहीद पालकर व तबरेज पालकर यांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले. दोघांना ७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.