कराड प्रतिनिधी | सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपींकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणत ३६ लाख ४० रूपये किंमतीचे अर्ध्या किलोचे दागिने आणि गुन्हयात वापरलेले ५ लाख ५० हजार रूपये किंमतीचे वाहन, असा ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
कराडमधील शिवाजीनगर हौसिंग सोसायटीतील बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी घरातील ३७ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले होते. चोरी झालेल्या ऐवजात हिऱ्याचे दागिनेही होते. ३० मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देउन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फाणे, उपनिरीक्षक अमित पाटील, कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करण्यात आली होती.
कराडच्या शिवाजी हौसिंग सोसायटीतील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक, अर्धा किलोचे दागिने जप्त pic.twitter.com/3NNNoA7Ux8
— santosh gurav (@santosh29590931) April 20, 2024
तपास पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त केला. सदर वाहन रेकॉर्डवरील आरोपी रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिवंडी, जि.ठाणे) याचे असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकांनी ठाणे येथे जावून आरोपीच्या घराच्या आजुबाजूच्या परिसरात वेषांतर करुन सलग ४ दिवस पाळत ठेवली. आरोपी रमेश महादेव कुंभार हा सातारा बसस्टॅन्ड परिसरात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यावरून तपास पथकांनी आरोपी रमेश कुंभार आणि त्याचा साथीदार नीलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगांव, जि. सातारा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनाही तपासकामी कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोरीला गेलेल्या दागिण्यांपैकी ३६ लाख ४० हजार रूपये किंमतीचे ५२ तोळे (अर्धा किलो) दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली साडे पाच लाख रूपये किंमतीची महिंद्रा टी.यु.व्ही. (क्र. एम. एच. ४६ बी. ए. ४५१४), असा एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून एलसीबीने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीचे मिळून १९२ गुन्हे उघडकीस आणत ३ कोटी ८२ लाख ४० हजार रूपये किंमतीचे साडे पाच किलो सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.