विद्यानगर परिसरात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर गावच्या हद्दीत विद्यानगर परिसरात पिस्टल बाळगून विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. यावेळी त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनस अशा 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अभिषेक राजेंद्र नांगरे (वय 23, रा. मोरया कॉम्प्लेक्स आगाशिवनगर, ता. कराड), निकेतन राजेंद्र पाटील (वय 34 रा. मारुल ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील शशिकांत काळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड तालुक्यातील विद्यानगर महाविद्यालय रस्त्यावर तारांगण बिल्डींग समोर एकजण व त्याचा साथीदार संयशितरित्या पिस्टल बाळगून फिरत आहे. याबाबतची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, शशिकांत काळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, अमित पवार यांचे पथक तयार केले. तसेच या पथकाकडून गस्त घालण्यास सुरुवात केली.

विद्यानगर येथील श्री. शाहू गृह निर्माण संस्थाकडे जाणारे रोडवर तारांगण बिल्डींग समोरुन अभिषेक नांगरे व निकेतन पाटील हे बोलत चालत जात असताना पथकास आढळून आले. त्यातील एकजण कमरेला हात लावून चालत होता. त्याबाबत पथकातील पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलीस हवालदार शशिकांत काळे व अमोल देशमुख यांनी गाडीतून खाली उतरून पळत जाऊन एका संशयितास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा साथीदार पळून जाऊ लागला. त्याला मुकेश मोरे, अमित पवार यांनी पळत जाऊन ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनसह मिळून आले. पोलिसांनी अभिषेक नांगरे व निकेतन पाटील या दोघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डिसले करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, कुलदीप कोळी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील यांनी केली.