कराड प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील मुंजवडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. गांजा या अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा व 1 लाख रुपये किमतीच्या दुचाकी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाळू गणपत कदम (वय 51, रा. कुरबाबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व बाळासो रामचंद्र रणदिवे (वय 50, रा. मुंजवडी, ता. फलटण, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांची विक्री हो असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. तसेच त्यांना सातारा जिल्हयातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दि. 03/07/2023 रोजी एक इसम युनिकॉन कंपनीच्या दुचाकीवरून मुंजवडी, ता. फलटण गावातील माध्यमिक शाळेजवळ अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.
त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना नमुद इसमास ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी सापळा लावून नमुद इसमास व खरेदी करण्याकरीता आलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमांच्या कब्जात एकूण ५ लाख रुपये किमतीचा २० किलो गांजा तसेच १ लाख रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचेविरुध्द फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं. १३५४ / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब)(ii) (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळूंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी सदरची कारवाई केली. या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.