सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे दोन जनावरांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 76 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, पशुपालक धास्तावले आहेत.

पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभर जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनावरामध्ये लम्पी त्वचारोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य व वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या रोगाचा कीटकापासून प्रसार होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन

विभागासह राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 251 जनावरांना लंपी त्वचारोग झाला असून त्यापैकी 171 जनावरांवर उपचार झाल्याने ती बरी झाली आहेत. सद्यस्थितीत कोरेगाव तालुक्यात 10, फलटण 12, खंडाळा 29, वाई 15, जावली 10 असे मिळून 76 जनावरांना लंपी त्वचारोगाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने गोवर्गीय जनावरांना प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 436 गाई वर्गातील जनावरांची संख्या आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लंपी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 80 टक्के म्हणजेच 2 लाख 78 हजार 81 जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात आले आहे.