अडीच वर्षात 52 हजार लोकांवर हल्ला! 10 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे.

मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत असे होत नाही. तसेच त्यांच्या वाढीवरही नियंत्रण राहत नाही. या कुत्र्यांकडूनच अधिक करुन नागरिक, जनावरांवर हल्ले होतात. यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही पुढे येतात. आताही सातारा शहरात तब्बल ३३ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय. यामुळे घबराटीचे वातावरण आहे. पण, मागील काही वर्षातील आकडेवारी विचारात घेता कुत्र्यांच्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे चिंता करण्यासारखीच स्थिती आहे.

जिल्ह्यामधील कुत्र्यांच्या चाव्याची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार मागील अडीच वर्षांच्या काळात तब्बल ५२ हजार ६७६ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय. हे प्रमाण नक्कीच अधिक आहे. तर त्यापूर्वी २०१७ या वर्षात १६ हजार १३१, २०१८ या वर्षात २१ हजार ६८ नागरिकांवर हल्ला केल्याची नोंद आहे. तर २०१९, २० या दोन वर्षात हल्याचे प्रमाण वाढलेले होते. ०१९ मध्ये २६ हजार ३९२ तर २०२० मध्ये २६ हजार २५७ जणांना चावा घेतला आहे.

तालुकानिहाय कुत्रा चावा

१ जानेवारी २०२२ ते ३१ आॅगस्ट २०२४

जावळी : १६१७
कराड : ७५४५
खंडाळा : ३४९५
खटाव : ५५९०
कोरेगाव : ४३६६
महाबळेश्वर : १४८२
माण : ५६९५
पाटण : ३८१४
फलटण : ७७१८
सातारा : ७००८
वाई : ४३४६