साताऱ्यातील NCP भवनसमोर खा. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तुतारी चिन्हाचे अनावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला काल गुरुवारी तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले. यानंतर आज शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनसमोर पदाधिकाऱ्यांच्यावतीने चिन्हाचे अनावरण केले. यावेळी ‘आमची तुतारी, विजयाची’ तयारी अशा गगनभेदी घोषणा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला. तर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी तुतारी चिन्ह हे विजयाचे प्रतीक असून आम्ही कोणतीही लढाई असो त्यामध्ये विजय हा मिळवणारच, अशी प्रतिक्रिया देखील ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्ये दोन गट पडलयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यानंतर खा. शरद पवार यांच्या गटाला नाव मिळाले परंतु चिन्ह कोणते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने खा. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे यापुढे पवार गटाच्यावतीने तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढविली जाणार आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर आज शुक्रवारी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनसमोर पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वतीने तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, शफिक शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘शरद पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे पिछे है, ‘आमची तुतारी, विजयाची तयारी’, अशा या घोषणा देखील दिल्या.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावांच्या भूमीतून ही तुतारी फुंकत आहोत : सुनील माने

आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार यांना शुभ संकेत असणारे तुतारी हे चिन्ह मिळाले. देशात लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरु आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. या देशात शाहू, फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपवण्याचे काम सुरु आहे. या विरोधात तुतारी फुंकण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात घेतला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या भूमितून ही तुतारी फुंकत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.