कराड प्रतिनिधी । राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात वंध्यत्व निवारण शिबिर घेतले जात आहे. दरम्यान, पोगरवाडी, ता. सातारा येथे वंध्यत्व निवारण शिबिरात 25 गाई, म्हशींवर उपचार करण्यात आले. यावेळी गाईंवर कृत्रिम रेतन करण्यात आले. या शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक परळी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरामध्ये वंध्यत्व असलेल्या 17 गाई व आठ म्हशींवर उपचार करण्यात आले.
दोन गाईंना कृत्रिम रेतन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडील विविध योजना तसेच जनावरांमधील वंध्यत्वाची कारणे याबाबतची माहिती डॉ. अर्चना नेवसे- जठार यांनी दिली. शिबिरामध्ये रुपेश भिंगारदिवे, योगेश पवार व संपत गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिबिराच्या आयोजनासाठी पोगरवाडीचे माजी सरपंच भोसले तसेच पोलीस पाटील श्रीमती वैशाली गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.