कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रे आम्ही तळ हातातील फोडाप्रमाणे जपली आहेत. 19 तारखेला एसटीतून मतदान केंद्रावर जाताना ती आमच्याप्रमाणे तुम्हीपण जपा तरच मतदानादिवशी ती आपल्याला जपतील अशी विनोदनिर्मिती करून मतदान मशीन्स जिवाप्रमाणे जपा व सुस्थितीत न्या, अशा सूचना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केल्या.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी बाहेरील तालुक्यातून नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांचे येथील यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल) कराड येथे प्रशिक्षण पार पडले. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, व्ही.आर.रजपूत यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण सुरू असतानाच केरळ राज्याच्या सीनियर ऑफिसर तथा निवडणूक निरीक्षक गीता ए यांनी प्रशिक्षण वर्गास भेट दिली. त्या म्हणाल्या, मी या मतदारसंघात दाखल झाल्यापासून कामकाजाचा आढावा घेत आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे कामकाज सुरू असल्याचे पाहून समाधानी आहे. आता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व त्यांच्या सर्व टीमने चांगल्या पद्धतीचे कामकाज करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रोटोकॉलनुसार पोलीस बंदोबस्तातच स्ट्राँगरूम मधून मशीन बाहेर काढल्या जातील. आपणास नेमून दिलेल्या टेबलवरून त्या त्या केंद्रांना सर्व साहित्य दिल्यानंतर, त्यासोबत एक यादी दिली जाईल. यादीनुसार सर्व साहित्य काळजीपूर्वक तपासून घ्यावे. त्यानंतर सर्व मशीन्स व साहित्य आपल्याच केंद्राच्या आहेत, याबाबतची खात्री पटल्यानंतर पोलीस बंदोबस्तातच जीपीएस असलेल्या एसटी बस अथवा जीपमधून तुम्हाला केंद्रावर पोहोचविले जाईल.
मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर नेमणूक केलेल्या शिपाई व अन्य यंत्रणेकडून आपणासाठी सर्व सोयीनियुक्त सुसज्ज खोली, फर्निचर व पाणी व्यवस्था करण्यात आली असेल. तेथील बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तुमच्याशी संपर्कात राहतील. गेल्यानंतर 100 व 200 मीटरवर लाईन मारून घ्यावी. केंद्रातील आक्षेपार्ह लिखाण, चिन्हे, फोटो भिंतीकडे फिरवा अथवा न दिसतील असे सुरक्षित ठेवा. दरम्यान 19 तारखेलाच दुपारनंतर सर्व केंद्र सुसज्ज लावून सर्वांनी भारतीय बैठक मारून फॉर्म भरण्यासह प्राथमिक कामकाज पूर्ण करावे. म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणत्याही ताण तणावाशिवाय कामकाज पूर्ण करता येईल.
उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आदल्या दिवशी संपर्क करा. त्यांचे फॉर्म भरून घ्या. मतदानादिवशी सकाळी उमेदवारांच्या उपस्थित प्रतिनिधींसमोर वेळेत मॉकपोल सुरू करा. नोटा सह प्रत्येक उमेदवारास समान मते देऊन सर्वांची खात्री पटल्यानंतर मशीन सील करून घ्या व ठीक 7 वाजता मतदानास प्रारंभ करा. तसा रिपोर्ट सेक्टर ऑफिसर्सना द्या असे सांगून सर्वांनाच आदर्श कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनी श्री शिवाजी विद्यालयात हँड्सऑन ट्रेनिंग घेतले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी अत्यंत चांगल्या व सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिल्याचे समाधान घेऊन आपापल्या गावी परतले.