कराडात विधानसभेसाठी नियुक्त सर्व सूक्ष्म निरीक्षकांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । 259 कराड उत्तर व 260 कराड दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक कराड तहसील कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निरीक्षक गीता ए, सहाय्यक निवडणूक निरीक्षक राहुल घनवट, कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.

यावेळी बैठकीस निरीक्षक गीता ए, निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व विक्रांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी महत्त्वाचे असून सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडावी असे आवाहन केले. 10 नोव्हेंबरला जिल्ह्यावरून सर्व मशीन्स कराड तालुक्यात दाखल होतील. त्या सर्व मशीन्स उमेदवार किंवा प्रतिनिधी व निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर तपासण्यात येतील. त्याचवेळी कोणत्या केंद्रावर कोणत्या मशीन द्यायच्या याच्या जोड्या लावण्यात येतील. त्यानंतर 11, 12 व 13 नोव्हेंबरला बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स उमेदवारांची नावे व चिन्हांसह तयार करण्यात येतील.

ही सर्व प्रक्रिया उमेदवारांचे प्रतिनिधी पाहू शकतील. तसेच ज्या मशीन्स मतदानासाठी तयार केल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 5 टक्के मशीन्सवर 1000 मते टाकून त्या योग्य आहेत का याची खातरजमा केली जाईल. फॉल्टी किंवा नादुरुस्त मशीन बाजूला काढून त्यांचे नंबर प्रतिनिधींना देण्यात येतील. आणि तयार मशीन्स स्ट्राँग रूमला इनकॅमेरा निगराणीखाली सुरक्षितपणे ठेवल्या जातील. मतदानादिवशी काही मशीन्स राखीव ठेवल्या असून अपवादात्मक ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्यास तिथे बदलण्यासाठी झोनल ऑफिसर व त्यांच्या स्टाफला त्या मतदानादिवशी पहाटे चार वाजता ताब्यात दिल्या जातील.

मतदानानंतर संध्याकाळी इनकॅमेरा सुरक्षिततेखाली स्ट्रॉंग रूमला ठेवल्या जातील व मतमोजणी दिवशी सकाळी 7 वाजता उघडल्या जातील. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल व त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मशीन ची मतमोजणी सुरू होईल. दरम्यान 13, 14 व 15 नोव्हेंबरला दिव्यांग आणि 85 वर्षावरील वृद्धांचे घरी जाऊन मतदान घेतले जाईल. यामध्ये मतदान अधिकारी व त्यांच्यासोबत उमेदवारांचे प्रतिनिधी असतील. त्यासाठी उमेदवारांनी अगोदर पोलिंग एजंट यांची यादी द्यावी. कराड उत्तर व दक्षिणमध्ये सुमारे 3500 टपाली कर्मचारी असून निवडणूक आयोगाच्या बदलानुसार टपाली मतदान हे नाव असले तरी 2024 पासून त्यात बदल झाला असून मतपत्रिका टपालाने पाठवल्या जात नाहीत तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी उपलब्ध करून देतात.

कर्मचाऱ्यांचे मतदान कार्यालयीन वेळेत घेतले जाते. कराड उत्तर साठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सैदापूर व  नगरपालिका शाळा कराड तर  दक्षिण साठी श्री. शिवाजी विद्यालय कराड या ठिकाणी मतदान केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक निरीक्षक गीता ए म्हणाल्या, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. कोठे काही अनुचित प्रकार किंवा चुकीचे काही घडत असेल तर थेट माझ्या 8149223632 या भ्रमणध्वनी क्रमांकाला तत्काळ माहिती द्यावी, अथवा शासकीय विश्रामगृह कराड येथे भेटावे. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

कराड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण विक्रांत चव्हाण म्हणाले, राजकीय परिपक्व असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रे कुठेही नाहीत. लोकसभेचा हाच इतिहास विधानसभेलाही सर्वांनी दाखवून द्यावयाचा आहे. दरम्यान 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता प्रचार थांबेल. त्यानंतर कुठेही सार्वजनिक प्रचार करता येणार नाही अशाही सूचना यावेळी दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी उपस्थित राजकीय प्रतिनिधींना दिल्या.