कराड प्रतिनिधी | कराड- मसूर रस्त्यावरील उत्तर कोपर्डेच्या हद्दीतील रेल्वे फाटकामध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुमारे एक दीड तास वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रेल्वे गेट पूर्ववत झाल्याने वाहतूक सुरळीत झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड – मसूर रस्त्यावर रेल्वे गेट क्र. ९६ मध्ये कोपर्डे हवेली बाजूच्या गेटमध्ये बिघाड झाल्याने ते बंदस्थितीत होते. रेल्वे प्रशासनाकडून तो बिघाड काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, गेट उघडत नसल्याने वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे दोन्ही बाजूकडे सुमारे एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, नडशीचा भुयारी मार्ग रेल्वेच्या कामासाठी बंद असल्यामुळे धुरुंगमळ्यालगत असलेल्या पर्यायी मार्गाने देखील वाहनधारकांना जाता येत नव्हते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती वाहनधारकांची झाली होती. यावेळेत पाच रेल्वेगाड्या पास झाल्या. काही वेळानंतर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.