सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील घाटघाई देवीची आज आणि उद्या यात्रा होत आहे. दरम्यान, पाचगणी बसस्थानक ते घाटजाई मंदिर परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या बुधवार, दि. 6 या कालावधीत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
वाहतूक मार्गात करण्यात आलेले बदल हे पुढीलप्रमाणे, महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी वाहणे पाचगणी एसटी. स्टँड चौक मार्गे प्लाझा-टेबल लँड कॉर्नर-अपना हॉटेल-भीमनगर-जुने पोलीस ठाणे ते मुख्य रस्ता, या मार्गाने जातील. वाईकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान-चेसन रोड, शॉलम हायस्कूल-न्यू इरामार्गे रश्मी चौक-मुख्य रस्ता या मार्गे जातील.
महाबळेश्वरहून वाई, पुण्याकडे जाणारी अवजड वाहने सकाळी 11 ते रात्री 12 पर्यंत संजीवन नाकामार्गे करहर-कुडाळ-पाचवड या मार्गेे जातील. महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहने पाचवडमार्गे कुडाळ-करहर-संजीवन नाका (महाबळेश्वर) या मार्गे जातील. याचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा आदेश पोलीस अधीक्षक शेख यांनी दिला आहे.