सातारा प्रतिनिधी | आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मतदानानिमित्त मतदार संघाबाहेर पुणे – मुंबई येथे राहणारे मतदार बांधव गावी येत मतदान करून परत जात आहेत. अशात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी असून त्यातच पुणे-मुंबईकडून गावाकडे मतदान करण्यासाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत अडकले आहेत. परिणामी आपले मतदान होते की नाही या काळजीत ते मतदार पडले आहेत तर प्रशासनाला याबाबत काही घेणं देणं नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे-सातारा महामार्गावर नवले ब्रिज येथील सुवर्णमंदिर पासून ते वरवेपर्यंत जवळपास १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सातारा बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर चक्काजाम झाला आहे. खेड शिवापुर तसेच शिवरे ( ता. भोर) येथील होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने पुणे, मुंबईकडून सातारा सांगली, कोल्हापूर, महाबळेश्वरकडे जाणारी वाहने उलटसुलट जात असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
पुणे-सातारा महामार्गावर सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहने मोठी प्रमाणावर असल्या कारणाने नवले ब्रिज सुवर्ण मंदिर, दरीपुल, गोगलवाडी फाटा, कोंढणपूर फाटा, खेड शिवापुर टोलनाका, शिवरे, वरवे येथील मार्गावर वाहने अडकले आहेत. गावाकडे जाणारे मतदारांना आपले मतदान होईल की नाही ? या चिंतेत असल्याचे दिसून आले. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम करणारे निखिल कन्स्ट्रक्शन कडून कामात सुधारणा होत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकले आहेत. तातडीने वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची गरज आहे.