सातारा प्रतिनिधी । तीन दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. त्यात खंबाटकी घाटात झालेल्या कोंडीचा फटका वाहनचालकांना बसला आहे.
पुणे ते सातारा जाण्यासाठी खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी जवळपास २-३ किमी वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. त्यात वाहनांचे इंजिन गरम झाल्याने याठिकाणी १०० पेक्षा जास्त वाहने घाटातच बंद पडली आहे. त्यामुळे वाहन चालकांची पंचाईत झाली आहे. नाताळच्या सुट्ट्या असल्याने बऱ्याच जणांनी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. गोवा, महाबळेश्वर यासारख्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी मुंबई – पुणे येथील लोक या महामार्गाचा वापर करतात. त्याचाच परिणाम आज झालेल्या वाहतूक कोंडी कों त पाहायला मिळत आहे.
पारगाव खंडाळ्यापासून हा घाट सुरू होतो. याठिकाणी घाटात अनेक वाहने इंजिन गरम झाल्याने बंद पडली आहेत. या परिस्थितीमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची रुंदी वाढवावी यासाठी वारंवार मागणी होते. परंतु प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाही. त्याचेच हे चित्र खंबाटकी घाटात पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आणि बंद पडलेली वाहने यामुळे याठिकाणाहून पर्यायी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी यासाठी पोलीस प्रशासन हालचाली करत आहे.