कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैदापूर (ता. कराड) येथील सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीचे एक वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत सैदापूर कॅनॉल ते ओगलेवाडी रोड गणपती मंदिर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही. सुर्ली घाट विटा मार्ग, तसेच शामगाव घाट मार्गे कराडकडे कोणत्याही प्रकारचे जड वाहन, एसटी बस यांना करवडी फाटा- ओगलेवाडी- सैदापूर कॅनॉल हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. सैदापुर कॅनॉल- कृष्णा सर्कल-विजय दिवस चौक- भेदा चौक- पोपटभाई पेट्रोल पंप- कोल्हापूर नाका- ढेबेवाडी फाटा- कृष्णा हॉस्पिटल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.
कृष्णा हॉस्पिटल- ढेबेवाडी फाटा- खरेदी विक्री पेट्रोल पंप, कोल्हापूर नाका युटर्न- कोयना मोरी- म. गांधी पुतळा- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक- कृष्णा सर्कल- सैदापूर कॅनॉल या मार्गावर कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही. चिपळूण- पाटण- ढेबेवाडी- उंडाळे- तासगाव- इस्लामपुर या बाजूकडून येणारी व विटा, औंध- पुसेसावळी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कराड शहरात प्रवेश न करता महामार्गावरुन तासवडे- शिरवडे- मसुर- शामगाव घाट मार्गे विटा- औंध- पुसेसावळी बाजूकडे जातील. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (रुग्णवाहिकेसाठी) सैदापूर कॅनॉल- गणपती मंदिर- ओगलेवाडी मार्ग बंद राहील. त्याऐवजी सैदापूर कॅनॉल- बनवडी फाटा- गजानन हौसिंग सोसायटी- गणपती मंदिर- ओगलेवाडी चौक- करवडी फाटा या मार्गाचा वापर करावा, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
विटा सुर्ली घाट मार्गे, तसेच शामगाव घाट मार्गे कराडमध्ये येणारी एसटी, जड वाहने मसूर- उंब्रज- तासवडे टोल नाका- महामार्गाने कोल्हापूर नाका मार्गे कराडमध्ये येतील. ओगलेवाडी- रेल्वे स्टेशनकडील वाहने ओगलेवाडी चौक- एमएसईबी बनवडी- बनवडी फाटा- कोपर्डे- सहयाद्री साखर कारखाना- शहापूर फाटा- शिरवडे- तासवडे- वहागाव मार्गे महामार्गाने कोल्हापुर नाका मार्गे कराडमध्ये येतील. वाहतूक ज्या-ज्या ठिकाणांवरुन वळविण्यात आली आहे अथवा बंद करण्यात आली आहे. अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
सातारा बाजूकडून येणारी चारचाकी वाहने उंब्रज- मसुर- सहयाद्री साखर कारखाना- कोपर्डे- बनवडी फाटा- वेणुताई चव्हाण कॉलेज- शासकीय इंजिनिअरींग कॉलेज या ठिकाणी पार्क करावीत. सांगली जिल्हयातून विटा- कडेगाव मार्गे व औंध- पुसेसावळी यामार्गे येणारी चारचाकी व दुचाकी वाहने करवडी फाटा-ओगलेवाडी मार्गे गजानन हौसिंग सोसायटी येथील सूर्या फर्निचरपासुन पूर्वेस असणाऱ्या अमर जाधव यांच्या (शेतात) मैदानावर पार्क करतील. चिपळूण, पाटण, ढेबेवाडी, उंडाळे बाजूकडून सभेकरीता येणारी चारचाकी वाहने कोल्हापुर नाका युटर्न- कोयना मोरी- म. गांधी पुतळा- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक- कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल- एसजीएम कॉलेज पाठीमागे हॉलीफॅमिली येथील पैसा फंड व लिगाडे पाटील कॉलेज येथील मैदानात पार्क करावीत. इस्लामपूर, तासगाव, उंडाळे, ढेबेवाडी, पाटण या भागातून सभेकरीता येणारी दुचाकी वाहने ही कोल्हापुर नाका यूटर्न- कोयनामोरी-म. गांधी पुतळा-पोपटभाई पेट्रोलपंप-भेदा चौक-विजय दिवस चौक-कृष्णा सर्कल- सैदापुर कॅनॉल येथील पार्किंग ठिकाणी पार्क करावीत. सातारा- उंब्रज बाजूकडून येणारी दुचाकी वाहने फार्मसी कॉलेज विदयानगर येथे पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.