कराड प्रतिनिधी । आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी निरोप दिला जाणार आहे. या निमित्त कराड शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. उद्या गुरूवार, दि. 28 रोजी वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलानुसार शहरातील दत्त चाैक- चावडी चाैक ते कृष्णा घाट या मुख्य मार्गावर दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांना प्रवेश करण्यास तसेच पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कराड शहर परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणेश मुर्तीचे दरवर्षी कृष्णा नदीपात्रात विसर्जन होते. यंदा वर्षी देखील मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी गुरूवारी दि. 28 रोजी सकाळी 6 ते दि. 29 रोजी सकाळी 7 पर्यंत वाहतुकीत बदल करण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार कराड शहरातील पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, चोरीच्या घटना घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे शहरातील चौकाचौकात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाच्या घटनांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कराड शहरातील ‘या’ ठिकाणी वाहतुकीत बदल
1) कराड शहरातील कृष्णा नाका बाजुकडुन कराड शहरात सोमवार पेठ मार्गे कृष्णा घाटकडे जाणारी वाहतुक ही कृष्णा नाका जोतीबा मंदिर – कमानी मारुती मंदीर- सोमवार पेठ पाण्याची टाकी- जनकल्याण बँक मार्गे सुरु राहणार आहे. तसेच सोमवार पेठ येथील नागरिक कराड शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
2) कोल्हापुर नाका बाजुकडुन कराड शहरात येणारी व कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतुक ही दत्त चौक- आझाद चौक- सात शहीद चौक- शुक्रवार पेठ- बालाजी मंदीर या मार्गावरून वळविण्यात आली आहे.
3) दत्त चौक- यशवंत हायस्कूल- आझाद चौक- नेहरु चौक- चावडी चौक- बालाजी मंदीर- झेंडा चौक- कृष्णा घाट या गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सर्व वाहनांना (दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने) प्रवेश करण्यास अथवा पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
4) दत्त चौकाकडे येणा-या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करणेत आलेला आहे.
5) आपत्कालीन परस्थितीमध्ये नेहमीच मिरवणुक मार्गासाठी पर्यायी रस्ता कर्मवीर पतळा- पायल फुटवेअर- अंडी चौक ते पाण्याची टाकी, रविवार पेठ ते नेहरु चौक या मार्गावरील दुर्तफा दुचाकी व चारचाकी वाहने नो पार्कींग झोन करणेत आलेला आहे.
6) वरील सर्व मार्गावर रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने, पोलीस दलाची वाहने वगळुन इतर सर्व वाहनांच्या मार्गात बदल केलेला आहे.