महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना घडले पांढऱ्या शेकरूचे दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात आज गुरुवारी काही पर्यटकांना पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरुने दर्शन दिले. पांढऱ्या शेकरुला पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात क्लिक करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक लोक प्रयत्न करत होते.

शेकरु महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाबळेश्वर येथील जंगल परिसरात अनेक वन्यजीवांचे अस्तित्व असून या वन्यजीवांमध्ये प्रमुख आकर्षण शेकरुचे आहे. खारीपेक्षा आकाराने मोठी असणारी खार म्हणजे शेकरू. परिसरामध्ये शेकरू मोठ्या प्रमाणावर आढळतात. बऱ्याचदा येथे फिरताना सहज झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना त्याचे दर्शन होते. झाडावरील फळे हा त्याचा मुख्य आहे तर झाडाच्या सुरक्षित उंचीवर सुक्या काटक्यांच्या सहाय्याने तो आपले घर बांधतो.

अनेकदा वन्य प्राण्यांमध्ये मेलानिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग अर्धवट पांढरा किंवा पूर्ण पांढरा होत असून सहसा दुर्मिळ अशा पांढऱ्या शेकरूचे दर्शन क्वचितच होते. तर महाबळेश्वर येथील तहसील भागात झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारताना आज पुन्हा एकदा पांढऱ्या शेकरूचे दर्शन झाले असून यापूर्वीही महाबळेश्वरच्या जंगलं परिसरात त्याचे दर्शन झाले आहे. या परिसरात कामानिमित्त येणारे लोक मोठ्या कुतूहलाने त्याचे व्हिडिओ, फोटो काढत होते.

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे.