सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाना अडवून शस्त्राचा धाक दाखवल्याची घटना घडली आहे. यावेळी पर्यटकांची दहा जणांच्या टोळीने लूटमार केल्याच्या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे.
अधिक माहिती अशी की, फलटण येथील राहुल भारत मंजरतकर यांच्याकडे त्यांचे नातेवाईक मनोज रामचंद्र शेडगे (रा. घाटकोपर, मुंबई) हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी वेळी पाहुणे म्हणून आले होते. दि. 8 जुलै 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहुल त्यांची पत्नी सुषमा राहुल मंजरतकर तसेच दोन मुली सेजल (वय 21 वर्ष), जुई (वय 15 वर्ष), मुलगा सार्थक (वय 10 वर्ष) व पाहुणे मनोज रामचंद्र शेडगे हे धुमाळवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास धबधबा पाहून माघारी येत असताना धबधब्यापासुन साधारण 200 मीटर अंतरावर आल्यानंतर झाडाझुडपातुन दोनजण पळत राहुल यांच्या दिशेने आले.
जवळ येताच पर्यटकांना, थांबा थांबा पळु नका असे मोठमोठ्याने म्हणुन त्याच्या साथीदारांना पर्यटकांकडे हाताने इशारे करून ह्यांचे दागिने काढा, त्यांच्या बॅगा चेक करून पैसे काढा असे सांगत होता. दुसर्याच्या हातात लोखंडी सुरा होता त्याने अंगात काळपट रंगाचा हाफबाह्याचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तो अंगानेसडपातळ व रंगाने काळासावळा होता. त्याने राहुल यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात हात घालुन 1 हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतल्यावर मागून येत असलेल्या पर्यटकांपैकी काही महिलांचे चाकु दाखवुन त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेतले.त्याचवेळी त्यांच्या पुढून आलेल्या त्यांच्या दोन साथीदारांपैकी एकाच्या हातात लोखंडी सुरा होता. तो आरोपी उंचीने साडेपाच फुट होता.
त्याचे केस पुर्णपणे मागे वळालेले होते. त्याने अंगाल मोरपंखी रंगाचा फुलबाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तो त्याच्या हातातील सुरा मनोज रामचंद्र शेडगे यांच्या पोटाला लावुन त्यांना, घड्याळ काढ असे म्हणाला. त्यावर मनोज रामचंद्र शेडगे यांनी त्यांच्या हातातील 2 हजार रुपये किंमतीचे घड्याळ काढुन त्यास दिल्यानंतर त्याने फिर्यादी राहुल यांची पत्नी सुषमा राहुल मंजरतकर हीस चाकु दाखवुन गळ्यातील मंगळसुत्र काढ असे म्हणुन तिच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने तोडून घेतले. त्यानंतर त्याने मनोज रामचंद्र शेडगे यांच्या पाठीवरील सॅकबॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्यामधील 1 हजार 500 रुपये काढून घेतले.
यावेळी त्यांचा चौथा साथीदार हा त्याच्याहातातील काठी राहुल व इतर पर्यटकांवर उगारुन इथुन हालायचे नाही असे म्हणुन पर्यटकांना तेथुन जाऊ देत नव्हता. त्यानंतर काहीवेळाने धुमाळवाडी बाजुकडुन त्यांचा पाचवा साथीदार राहुल व इतर पर्यटक यांच्या दिशेने पळत येत चला सोडून द्या ह्यांना चला पळा असे म्हणाल्यावर ते सर्वजण धबधब्याच्या दिशेने निघुन गेले. ते निघून जाताना झाडा मधून आणखी पाचजण त्यांचे मागे निघून गेले. सदरच्या लुटमारीमध्ये सुमारे 54 हजार 500 रुपये किंमतीचा व दुसऱ्या अनोळखी पर्यटकांकडील मनीमंगळसुत्र व चांदीच्या अंगठ्या असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा अज्ञात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस कर्मचारी याचा अधिक तपास करत आहे.