सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे सध्या नाताळच्या सुट्टयांमुळे पर्यटकांनी चांगलेच बहरले आहे. नाताळ सणामुळे या ठिकाणी सर्वत्र झगमगाट पहायला मिळत आहे. शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची सोमवारची सुट्टी जोडून आल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर व पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक वाढू लागले आहे.
हिवाळा म्हणतील कि थंडीचा महिना या महिन्यात पर्यटक निसर्गपर्यटन स्थळी फिरण्यासाठी जातात. कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा महाबळेश्वर पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने बहरलेलं पहायला मिळत आहे. या ठिकाणी पर्यटकांबरोबरच शालेय सहलींची संख्या देखील वाढू लागली आहे. मेरी ख्रिसमस… म्हणत नाताळ सॅन साजरा करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल होऊ लागले आहेत.
दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो. नाताळसह नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. नाताळसाठी एक दोन महिने आधीच हॉटेल लॉजिंगसह बंगले आरक्षित झालेले आहेत.
नौका विहारासाठी वेण्णा परिसर झाला हाऊसफुल्ल
सध्या नाताळ सुट्टयांमुळे महाबळेश्वर बहरले असल्याने नौका विहारासाठी वेण्णा परिसरात पर्यटक गर्दी करू लागले आहेत. याचबरोबर प्रमुख पॉईंटस्लाही पर्यटक भेटी देत आहेत. थंडीच्या कडाक्यातही महाबळेश्वरमध्ये हातगाडे व रेस्टॉरंटवर विविध खाद्यपदार्थावर पर्यटक ताव मारत आहेत. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळेसही स्ट्रॉबेरी विथ क्रिम, आईसगोळा अशा थंड पदार्थांसोबतच गरमागरम मका पॅटिस, स्प्रिंग पोटॅटो, शोर्मा सारख्या पदार्थाची पर्यटक चव चाखत आहेत.
जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई
महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुलांची आकर्षक सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध थीम्स, विविध गेम्सची धूम वाजवल्या जात आहेत. अनेक रिसाटसवर नाताळबाबांची प्रतिकृती तसेच ख्रिसमस ट्री देखील आकर्षकरित्या सजवली गेली आहे. येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला देखील आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, सर्वधर्मीय बांधव येथे भेट देत आहेत.