वेण्णालेकवर नौकाविहार करत असताना पर्यटकांना टोळक्यांकडून मारहाण

0
2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील प्रमुख आकर्षणाचे ठिकाण असणार्‍या वेण्णालेकमध्ये नौकाविहार करत असताना पर्यटकांना टोळक्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे.या युवकाला झालेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.

यश जयवंत म्हात्रे (वय 22) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तन्वीर वारूणकर (वय 35), मुस्तफा (वय 35) व अन्य एकाविरोधात महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यश हा मित्र दीपक व प्रणय यांच्यासह सोमवारी दुपारी वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी आला होता. बोटींग करून झाल्यानंतर हे सर्व पालिकेच्या तिकीट कार्यालयाकडे गेले. यावेळी परिसरात असणार्‍या तन्वीर वारूणकर, मुस्तफा व अन्य एक अशा तिघांसोबत त्यांची बाचाबाची होवून त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. यामध्ये यश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे पालिकेने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचे धिंडवडे निघाले आहे.

मोठया संख्येने येथे पर्यटक येत असतात. या माध्यमातून पालिकेला दरवर्षी तीन कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे.