सातारा प्रतिनिधी | कास पठारावर फुलांचे सडे बहरत आहेत. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागली आहे. फुलांचा साज लेऊन कास पर्यटकांच्या स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे.
सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी, लाल तेरडा, पांढरे गेंद आणि कीटकभक्षी निळी सीतेची आसवे या फुलांची संमिश्र छटा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रानहळद (चवर), नीलिमा, दीपकांडी, मंजिरी फुलेही दिसत आहेत. त्यामुळे कासच्या विविधरंगी फुलांच्या दुनियेला हळूहळू बहर चढायला सुरुवात झाली आहे.
कास पठार कार्यकारी समितीमार्फत पठारावर ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी विविध ठिकाणी नैसर्गिक झोपड्या बनवल्या आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने या झोपड्यांचा मोठा आधार पर्यटकांना होत आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून बनवलेल्या झोपड्या पर्यावरणपूरक, आकर्षक आहेत.