सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुले सद्या चांगलीच फुलली असून ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, मनमोहक फुले पाहण्यासाठी रविवारसह इतर दिवशी देखील पर्यटकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास पर्यटकांना सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी सोडवताना कास व्यवस्थापन समितीच्या यंत्रणेवर देखील ताण येत आहे.
कास पठारावर गेल्या काही दिवसांपासून रानफुले दिसू लागली आहेत. पाऊस उघडल्यानंतर ही फुले दिसू लागल्याने पर्यटक पठारावर येऊ लागले आहेत. शनिवार आणि रविवारी सुट्टीमुळे या ठिकाणी पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीत मोठी वाढ होत आहे. परिणामी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे कासची व्यवस्था पाहणारी यंत्रणाही कोलमडून जात आहे.
पठारावर फुले येतात त्यावेळी आगाऊ नोंद करत पाच हजार तर थेट पाच हजार असे दहा हजारांच्या घरात पर्यटक भेट देतात. यंदाच्या वर्षी गत आठवड्यात शनिवार आणि रविवार, सोमवारी देखील पर्यटकांची या ठिकाणी संख्या याहून खूप वाढल्याने फुले दिसण्याऐवजी पर्यटकांची संख्या जास्त पहायला मिळाली. या वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या भागातील पर्यटकांचे व्यवस्थापन करणाऱ्या कास वन पर्यटन समितीचे कामकाजही कोलमडून गेले. अखेर त्यांनी नंतर आलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश नाकारत अन्यत्र फिरण्याक्या सूचना दिल्या. दरम्यान या गर्दीमुळे पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.