पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी दिली अपशिंगे (मिलिटरी) गावास भेट; ग्रामस्थांना दिली ‘ही’ ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती आज आजी-माजी सैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी अपशिंगे (मिलिटरी) गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील 46 जवान शहिद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य सैन्य दलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांच्या या बलिदानामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. या गावच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही माजी सैनिक कल्याण, पर्यटन, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, गावचे सरपंच तुषार निकम, माजी कॅप्टन आर.डी. निकम, शंकर माळवदे आदी उपस्थित होते.

माजी सैनिक कल्याण मंत्री देसाई म्हणाले, अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील कुटुंबातील एकतरी व्यक्ती देश सेवा करीत आहेत. या गावातील माजी सैनिकांच्या शार्याची माहिती बाहेरील लोकांना व्हावी यासाठी वॉर मेमोरियल तयार करण्यात येईल. यातून युवा पिढीला प्रेरणा मिळून देश सेवेसाठी सैन्यदलात जातील.

अपशिंगे (मिलिटरी) गावावर प्रेम, आपुलकी व आदर आहे. या गावातील रस्ते, शाळा व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्यात येईल, अशी ग्वाहीही माजी सैनिक कल्याण मंत्री देसाई यांनी दिली.