सातारा प्रतिनिधी । पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता 35 सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
प्रयत्न विकासाच्या दृष्टितीने महत्वाच्या असलेल्या या प्रस्तावांना यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या 4 जिल्हयातील सहयाद्री व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांना निसर्ग पर्यटनातून रोजगार व उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे या भागातील गावांमध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विविध विषयांवर नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री देसाई पुणे विभागीय आयुक्त सैरभ राव दूरदृष्यप्रणालीद्वीरे उपस्थित होते. यामध्ये दि. 21 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाअन्वये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व सभोवतालचे क्षेत्रातील निसर्ग पर्यटन धोरण ठरविणे तसेच बफर क्षेत्रातील विकास कामांचे संनियंत्रण करणे आणि व्याघ्र प्रकल्पाच्या आत व भोवतालच्या इमारती इ. साठी मानके निर्माण करणे, निसर्ग पर्यटन आराखडयास मान्यता देणे, व्याघ्र प्रकल्पाची सापेक्ष पर्यटन वहन क्षमता, स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाला पर्यटन संस्थांना निसर्ग पर्यटन विषयक सल्ला देणे आदी सर्व बाबींसाठी 35 सदस्यीय स्थानिक सल्लागार समिती स्थापना करण्यात आली.
यावेळी आढवा बैठकीत मुनावळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे मार्फत सादर करण्यात आलेल्या शिवसागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या 45 कोटी 38 लाख रूपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. कोयना व वारणा नदी पात्रामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणांती विविध जल पर्यटन विषयक उपक्रम सुरू करण्यास समितीने मान्यता दिली.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सर्व पर्यटन उद्योगासंबंधी निवास सुविधांकडून नियमानुसार संवर्धन शुल्क घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रामधील गोकूळ तर्फ हेळवाक येथील पोलिस विभाग सातारा यांचे नियोजित महाराष्ट्र पर्यटन पोलिस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती बचाव दल, उपविभागीय अधिकारी पाटण यांचे मार्फत सादर करण्यात आलेल्या देशमुखवाडी आणि मोडकवाडी या ठिकाणी भूस्खलन झालेल्या गावांचा पुनर्वसन प्रस्ताव, बफर क्षेत्रामध्ये निसर्ग पर्यटनमध्ये स्थानिकांच्या सहभागाच्या अनुषंगाने नियमावली तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने ग्राम परिस्थितीकीय विकास समिती मार्फत बफर क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवस्थापन करण्याच्या प्रस्तावांना समितीने मान्यता दिली.
सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पोलिस विभाग सातारा, उपविभागीय अधिकारी पाटण आणि खाजगी क्षेत्रातील पर्यटन विषयक प्रस्तावांची अमंलबजावणी करताना प्रचलित नियमानुसार व वन आणि वन्यजीव यांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशा प्रकारे करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री श्री देसाई आणि विभागीय आयुक्त श्री राव यांनी स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये दिल्या.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, आर.एम. रामानुजम, साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी. राहूल रेखावार, उपसंचालक कोयना उत्तम सावंत, उपसंचालक चांदोली स्नेहलता पाटील, डॉ. सारंग कुलकर्णी, अमोल सातपुते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, के. एम. पाटील, पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय सातारा), एच. आर. म्हेत्रे यांनी उपस्थिती लावली होती.
सातारा जिल्हयातील प्रस्तावित ‘या’ 5 पर्यटन झोनच्या उपक्रमास मान्यता
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राकरिताच्या सन 2023-24 ते सन 2032 – 33 या कालावधी करितासाठी निसर्ग पर्यटन आराखडयास मान्यता देण्यात आली असून व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार असलेल्या सातारा जिल्हयातील प्रस्तावित 5 निसर्ग पर्यटन झोन कांदाट, मुनावळे, बामणोली, कारवट, कुसवडे, कोयना हेळवाक, पानेरी भोसगाव, सांगली जिल्हयातील मणदूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात मिळून असलेला आंबा अशा एकूण 7 निसर्ग पर्यटन झोन आणि झोन निहाय असलेल्या निसर्ग पर्यटन संकुल, स्थळे आणि पर्यटन वाढीस पूरक उपक्रम यांना मान्यता देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या वतीने मांडण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील, तालुक्यातील जिल्हयातील आणि राज्यातील विद्यार्थी यांना सहयाद्री व्याघ्र राखीवच्या प्रवेश फीमध्ये अनुक्रमे 100 टक्के, 75 टक्के, 50 टक्के आणि 25 टक्के सवलत तसेच बफर क्षेत्रातील स्थानिकांना 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्तावास बैठकीमध्ये मान्यता दिली.