सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या धबधब्यांतून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सातारा जिल्ह्यातील असे डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे (Satara Waterfalls) पावसाळ्यात फिरायचा प्लॅन करताय?; भेट द्या सातारा जिल्ह्यातील ‘या’ 7 धबधब्यांना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देण्यासाठी फिरायला येतात. सध्या तुम्हीही असा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खासच म्हणावी लागेल. कारण आम्ही तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाच धबधब्याबद्दल माहिती देणार आहोत. सातारा जिल्ह्यात खास अशी 6 धबधबे आहेत कि तेथे गेल्यावर पावसाच्या सरीसोबत मनसोक्त एन्जॉय करता येत आहे.
1) वजराई भांबवली धबधबा (Vajrai Bhambvali Waterfall)
आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. मुख्य म्हणजे, हा धबधबा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी आहे. शिवाय हा धबधबा अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे. देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो.
2) ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall)
आज आपण ज्या ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत, ते ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा. ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.
3) एकिव धबधबा (Ekiv WaterFall)
एकिव धबधबा कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते. धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित आहे. कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा आपल्या कुटुंबासोबत हमखास पहावा असा आहे. सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी वडापने तसेच स्वतः च्या चारचाकी, दुचाकीने तुम्ही या ठिकाणाला भेट देवू शकता. येथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे. येथे आल्यानंतर अनेक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आहेत. कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला, यवतेश्वर, वजराई धबधबा आदी.
4) धारेश्वर (Dhareshwar Waterfall)
धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर सातारा येथून 80 किलोमीटर अंतरावर आहे. धारेवश्वर डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच एक मठ व भक्तांसाठी निर्माण केले खोल्या आहेत. हा डोंगर अर्धवर्तुळाकार असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा आहेत येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. येथे येणाऱ्यांना राहण्यासाठी पाटण शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी सोय आहे. याठिकाणी स्वताःची गाडी असणे आवश्यक आहे.
5) ओझर्डे धबधबा (Ozerde Waterfall)
पाटण तालुक्यातील ओझर्डे धबधबा कोयना धरणाजवळ आहे. कोयना धरणाच्या बाजूने नवजा कडे जाताना ओझर्डे धबधबा 800 फुटावरून कोसळतो. कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा धबधबा येतो. त्यामुळे येथे वनविभागाने सुरक्षितेचे उपाययोजना केलेल्या आहेत. या ठिकाणाहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पाहता येतो. तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही येथेच काही अंतरावर आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी सातारा येथून उंब्रज मार्गे- मल्हारपेठ- पाटण- कोयनानगर- ओझर्डे असे जाता येते. एसटी बस कोयनानगर पर्यंत जाते.
6) केळवली धबधबा (Kelawali Waterfall)
सातारा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारा केळवली धबधबा. सध्या या धबधब्यातून पाणी वाहू लागले असल्याने पर्यटकांची पावले आता धबधब्याच्या दिशेने वळू लागली आहेत. धबधब्याकडे जाणारी वाटच डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. या प्रवासातच सर्वत्र हिरवा शालू पांघरलेली भुई, त्यावर धुक्यांची चादर आणि आभाळातून पडणाऱ्या सरी अशा आनंदी वातावरणात केळवलीकडे प्रवास सुरू होतो. केळवलीपासूनच काही अंतरावर सांडवली येथेही दोन टप्यात कोसळणारा आणखी एक धबधबा आहे. ताकवली गावातूनही नागमोडी पायवाटेने धबधब्यापर्यंत पोचता येते. या धबधबा मार्गावर जळू नावाचे कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यासाठी पर्यटकांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. साताऱ्यापासून 35 किलोमीटरवर असलेला केळवली येथील धबधबा मोजक्याच पर्यटकांपर्यंत पोहचला आहे. साताऱ्यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता आहे तिथून परळी फाट्यावर एक रस्ता ठोसेघरला, तर दुसरा केळवलीला जातो. उरमोडी जलाशयाच्या कडेकडेने निसर्गाची अनुभूती अनुभवत नित्रळ, खडगावपर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून काळेश्वरी घाटाने डोंगर उंचावरील केळवलीत जाता येते. वनराईत असलेल्या या गावातून पायी अर्ध्या तासात धबधब्याकडे जाता येते.
7) सडावाघापूर धबधबा (Sadavaghapur Waterfall)
विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस, पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य चाफळ विभागातील सडावाघापुर जवळील उलट्या धबधब्याची ठिकाणी पहायला मिळते. तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापुरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली कि पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापुर पठारावर पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडते. सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. सडावाघापुर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकांसह जिल्हयाबाहेरील पर्यटक या ठिकाणी भेट देतात.