कराड प्रतिनिधी । सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणून उद्या रविवार, दि. ३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कराडच्या शाही जामा मस्जिदीमध्ये सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी मस्जिद परिचय या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख हे देखील उपस्थित राहणार आहेत. यात अजानचा अर्थ, मस्जिदीचे सामाजिक महत्त्व, कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते? त्याचे आध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व, मस्जिदच्या विविध भागांची माहिती आणि त्यांचे महत्त्व इत्यादी माहिती देण्यात येणार आहे.
कराड येथील कार्यक्रमास पुण्याचे इस्लाम अभ्यासक इम्तियाज शेख, वाजीद कादरी, मंजूर खान संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराजबाबा यांना देखील आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शाही जामा मस्जिदचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.