कराड प्रतिनिधी । भारतात प्रत्येक स्वयंपाक घरात टोमॅटो (Tomato) ही फळभाजी प्रचंड महत्त्वाची झाली आहे. प्रत्येक भाजीत याचा वापर करण्यात येत असतो. टोमॅटोच्या वापराशिवाय भाजी करण्याचा विचार कोणताच व्यक्ती करू शकणार नाही. सध्या उन्हाळा सुरु झाला असून भाजीपाल्यांची आवक देखील वाढली आहे. मात्र, काही भाजीपाल्यांचे दर मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणार्या टोमॅटो पिकाचे यावर्षी भाव गडगडल्याने सर्वच भागातील शेतकर्यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे. टोमॅटो उत्पादन करणार्या संबंधित शेतकर्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दर पडल्याने टोमॅटोची लाली कमी झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात चाफळसह माजगाव, दोढोली, गमेवाडी, शिंगणवाडी, डेरवन, वाघजाईवाडी, जाधववाडी, केळोली, खोनोली, नाणेगांव, खराडवाडी परिसरातील शेतकरी अल्पकाळात भरपूर रोख उत्पन्न देणारी पिके म्हणून अनेक शेतकरी टोमॅटो हे पीक घेत आहेत. मात्र, यंदा टोमॅटोचे दर किलोला २० रुपये असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे मुश्किलीचे बनले आहे.
लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत मोठा खर्च
टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून या पिकासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. नवनवीन सुधारित जातीचे वैशाली, रुपाली, नामधारी, रश्मी इत्यादी टोमॅटोचे वाण बाजारात आले आहेत. 100 ग्रम बियाण्यांसाठी 1500 रुपायांपर्यंत लागवडीसाठी खर्च होतो. लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते. शिवाय खर्चही मोठा येतो. यामध्ये किटकनाशक फवारणी खर्च आंतरमशागतीचा खर्च खतांचा खर्च असतोच. परंतु याहीपेक्षा खर्चिक काम असते ते टोमॅटो झाडांना फळे आल्यानंतर आधार देण्यासाठी लागणार्या काठ्या व बांधाव्यास लागणार्या तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजूरी. ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते. त्यावेळी ही खर्च मोठ्या प्रमाणात होतो.
खरेदी 20 रुपयात विक्री 40 रुपये किलो
काबाड कष्ट करून जेव्हा माल तयार होतो. तेव्हा तो माल 20 ते 25 किलो क्षमतेच्या मोकळ्या खोक्यात भरून त्याचे पॅकिंग करून बाजारपेठेत पाठविला जातो. यासाठी 25 रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या टोमॅटोचे दर 10 ते २० रुपये आहे. म्हणजेच एका खोक्यात 40 ते 50 रुपयांचा माल असतो. यातून वाहतूक खर्च, मजुरांची मजुरी, आडत, खोके किंमत याचा खर्च वजा जाता शेतकर्यास एका खोके मागे 10 ते 15 रुपये अथवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक उरते. अथवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक उरते. २० रुपये किलोने खरेदी केलेल्या टोमॅटोची ४० रुपये किलोने विक्री बाजारात केली जाते.
टोमॅटोची आवक वाढल्याने दर कमी
चाफळ भागात १ एकरास ५ हजार किलो पेक्षा अधिक उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. छोट्या छोट्या प्लॉटच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जीवन जगण्यासाठी संघर्ष करणार्या शेतकर्यांचे टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या भागातील टोमॅटो पुर्ण, मुंबई, वाशी, बेळगाव, रत्नागिरी, चिपळूण येथे विक्रीसाठी जातो. टोमॅटोची आवक वाढल्याने दर दोन, तीन रुपयांवर आले असून मागणी कमी उत्पन्न अधिक अशी परिस्थिती असल्याने खर्चाच्या तुलनेत कवडीमोलाची किंमत मिळत आहे. केलेला खर्चही निघत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली.