कास पठारावरील रंगबेरंगी फुलं पाहायला आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या संततधार पावसामुळे काससह परिसरातील निसर्गसौंदर्य चांगलचं खुलून गेलं आहे. या ठिकाणी कास जलाशयातीळ पाणी ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. फुलांच्‍या हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात असल्‍याने त्‍यासाठीचे जास्‍तीचे मनुष्‍यबळ दररोज वापरावे लागत आहे. यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात ५० रुपये शुल्‍क आकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्‍या दोन ते तीन दिवसांत होणार आहे.

कास संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन समितीने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात ५० रुपये शुल्क ‍आकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. जागतिक वारसास्‍थळाच्‍या यादीत समावेश असणाऱ्या कास येथील पठारावरील फुलांचा नजारा, सौंदर्य पाहण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्‍‍यक सुविधा पुरविण्‍यासाठी सातारा वन विभाग तसेच स्‍थानिक वन व्‍यवस्‍थापन समिती कार्यरत असते. येणाऱ्या पर्यटकांकडून स्‍थानिकांना रोजगार प्राप्‍त होत असतानाच पठाराचे संवर्धन, संगोपनासाठी शुल्‍क आकारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

विशेष म्हणजे हे शुल्‍क फक्‍त फुलांच्‍या हंगामापुरतेच मर्यादित असते. सध्‍याच्‍या पावसामुळे पठारावरील फुले फुलण्‍यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. दुर्मिळ फुलांच्‍या हंगामास अजून अवधी आहे. कास, त्‍याठिकाणचा पाऊस, धुके, झोंबणाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेण्‍यासाठी सध्‍या राज्‍यभरातून पर्यटक येत आहेत. सुटीच्‍या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या हजारोंच्‍या घरात पोचते. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार आहे.