कराड प्रतिनिधी । दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार हे तसे फाईल तर उन्हाळा या ऋतूमध्ये घडतात. मात्र, पुणे – सातारा या मार्गावरील रस्त्यावर चक्क पावसाळ्यात वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. अचानक टायर फुटल्याने शिवाय जवळ कोणतेही टायर बसवण्याचे गॅरेज नसल्यामुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहेत.
पुणे – सातारा या महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर) येथील आडबल सिद्धनाथ मंदिरासमोरील उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिक – ठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास शान करावा लागतोय. धांगवडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील हे खड्डे अनेक अपघातांचे साक्षीदारही बनले आहेत.
उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेष म्हणजे पुणे – सातारा – कोल्हापूर – महाबळेश्वर या रस्त्याला नेहमी रहदारी असते. सध्या या मार्गावरील पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने त्यांची वाहणारे खड्यात जाऊन वाहनांचे टायर फुटत आहेत. खराब रस्ता आणि मोठं मोठे खड्डे बसल्यामुळे वाहने पंक्चर होणे, टायर फुटणे, पाटे तुटणे अशा घटना घडत आहेत. रस्त्याच्या दुरुस्ती अभावी या मार्गावरून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल नेणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दखल घेत दुरूस्ती करावी, अशी मागणी येथील प्रवासी, शेतकरी वर्ग, विद्यार्थ्यांमधून केली आहे.