सातारा प्रतिनिधी । “सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कामाला लावतो”, असे सांगून जिल्ह्यातील ३ युवकांची सुमारे ६ लाख रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश संभाजी कोळी (वय ३०) व अमित अशोक माने (वय ३३, दोघे रा. चरेगाव, ता.कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ऋषीकेश धनाजी न गावडे (वय १९, रा. गोखळी ता. फलटण) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत तक्रारदार ऋषीकेश गावडे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. यावेळी संशयित कोळी व माने यांच्यासोबत ओळख झाली. दोघांनी तक्रारदार गावडे याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीसाठी लावतो, असे सांगत आमिष दाखवले. नोकरी लागण्यासाठी पैसे लागतील असे देखील दोघांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदार गावडे याने संशयितांना रोख व ऑनलाईन अशी वेळोवेळी १ लाख ६४ हजार रुपये दिले. तक्रारदार ऋषीकेश गावडे यांचा मित्र किशोर लोंढे (वय ३७, रा. गुणवरे ता. फलटण) यांचीही संशयित दोघांची ओळख झाल्याने नोकरीचे आमिष दाखवण्यात आले.
त्यानुसार त्यांनीही वेळोवेळी रोख व ऑनलाईन अशी एकूण १ लाख ८५ रुपयांची रक्कम दिली. या दोन्ही तक्रारदार मित्रांनी संशयितांना पैसे दिल्यानंतर नोकरीचा तगादा लावला. मात्र, वेळोवेळी काम होत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी त्यांचे पैसे मागितले. संशयित दोघांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे देवून त्यानंतर संपर्क ठेवण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवले. या कालावधीत तक्रारदार ऋषीकेश गावडे, किशोर लोंढे, शैलेश गावडे यांचीही २ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार तक्रारदार यांनी एकत्रितपणे सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला.