सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड शहर परिसरातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या ३ इसमांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
टोळी प्रमुख १. बजरंग सुरेश माने, (वय ३०, रा. बुधरवार पेठ, कराड), २. चेतन शाम देवकुळे (वय २६, रा. १६८, महात्मा फुलेनगर बुधवार पेठ, कराड), ३. किशोर पांडुरंग शिखरे (वय २९, रा सरस्वती कॉलनी, गजानन हौसिंग सोसायटी गोवारे, ता. कराड) अशी टोळीतील तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संबंधितांच्यावर कराड शहर पोलीस ठाणे येथे दरोडयाची तयारीसह अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, साधी दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नुकसान करणे, यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. के. एन. पाटील, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातुन तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. यातील टोळीमधील इसम हे कराड शहर परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळयांची हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक मा. समीर शेख यांचे समोर सुनावणी झाली. यावेळी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे १. बजरंग सुरेश माने, २. चेतन शाम देवकुळे, ३. किशोर पांडुरंग शिखरे या टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातुन तसेच सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३२ उपद्रवी टोळयांमधील १०३ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३४ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १४१ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन आगामी विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे पोकों आनंदा जाधव, हर्षल सुखदेव, मपोकों सोनाली पिसाळ, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.