सातारा प्रतिनिधी | महाडमधील सव गावातील दर्ग्यात दर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरमधील तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळं महाबळेश्वरमधील गवळी मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे.
महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेल्या एकाचा पाय घसरून तो सावित्री नदीत पडला. त्याला वाचविताना अन्य दोघे पाण्यात पडले. तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमधील सख्खे भाऊ विवाहित होते.
तिघांच्या मृत्यूने महाबळेश्वरवर शोककळा
दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनावर शहाबुद्दीन नालबंद (रा. गवळी मोहल्ला, महाबळेश्वर) आणि जाहीद जाकीर पटेल (रा. रांजणवाडी, ता. महाबळेश्वर), अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. दिलावर हा वेल्डिंग कारागिर होता, तर त्याचा भाऊ मुनावर हा बांधकाम सुपरवायझर होता. सख्ख्या भावापैकी एकाची पत्नी मुले तर दुसऱ्या भावाचा मुलगाही दर्शनासाठी गेला होता. सव (ता. महाड) येथील दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर कुटुंबीय दर्गा परिसरात थांबले तर तिघेजण जेटीकडे गेले.
निसरड्या पायरीने केला घात
जेटीजवळच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना निसरड्या पायरीने घात केला. पायरीवरून एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या नादात इतर दोघेही पाण्यात पडले आणि तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली. दरम्यान, घटनेनंतर महाड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
पोहता येत नसल्यानं तिघांनी गमावला जीव
सावित्री नदीकाठच्या जेटीजवळ पाण्याचा खोल डोह आहे. त्यातच तिघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशीरा त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.