सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. वाई तालुक्यातील बावधन गावच्या हद्दीत दुचाकी व टेम्पोच्या अपघातात दोघे ठार झाले. तर सातारा तालुक्यातील चिंचणी गावच्या हद्दीत कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये एक ठार झाला. या घटनांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
बावधनजवळील अपघातात संतोष उत्तम मोरे (वय 48 रा. कुसगाव ता. वाई), दत्तात्रय सदाशिव जायगुडे (वय 55, रा. सिध्दनाथवाडी, वाई) हे दोघे तर चिंचणी हद्दीतील दुर्घटनेत मंगेश श्रीरंग धनावडे (वय 43, रा. मामुर्डी ता.जावली) हे ठार झाले. संतोष मोरे व दत्तात्रय जायगुडे व लहू निगडे हे रंगकाम करतात. काम झाल्यानतंर हे तिघे दुचाकीवरून वाई-पाचवड रस्त्यावर वाईकडे जात होते. त्यांची दुचाकी बावधन गावच्या हद्दीत वाकेश्वर मंदिर परिसरात आली असता भरधाव वेगात असलेली दुचाकी नियंत्रित न झाल्याने टेम्पोला पाठिमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये संतोष व दत्तात्रय हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तर लहू बाळकृष्ण निगडे (वय 52, रा. धोम कॉलनी, वाई) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी टेम्पो चालक निलप्पा शिवाप्पा वाल्मिकी (रा. हिवेरी राज्य कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची माहिती मिळताच सपोनि अमोल गवळी, हवालदार उमेश गहिण, गोरख दाभाडे, मंगेश जाधव, सागर नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसर्या घटनेत सातारा-मेढा रस्त्यावर चिंचणी ता. सातारा गावच्या हद्दीत भरधाव इर्टिगा कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मंगेश धनावडे यांचा मृत्यू झाला. कारचा टायर फुटून चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणार्या दुचाकी व क्रेटा कारला ठोकरले. मंगेश हा सातार्यातून चिंचणीला निघाला असताना हा अपघात झाला.