कराड प्रतिनिधी | पत्र्याचा आवाज का करतोस? असे म्हणून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाच्या दांडक्याने मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनकर चव्हाण असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सुनिल दत्तू पवार (वय 55), कविता सुनील पवार (वय 45), काजल पिंटू पवार (सर्व रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद सागर दिनकर चव्हाण (वय 25, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा सध्या रा. सुपने, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सागर चव्हाण त्याचा भाऊ, आई-वडील हे सध्या जयवंत पाटील यांचे गुन्हाळावरती ऊस याच्या कामासाठी मजुरीवर कामास आले आहेत. रविवारी रात्री 10.30 वाजणेच्या सुमारास दिनकर चव्हाण हे गुन्हाळावरती पत्रा शेडमध्ये येऊन झोपले होते. झोपेमध्ये त्यांचा हात पत्र्याच्या शेडला लागल्यामुळे पत्रा रोडचा आवाज होऊ लागला होता. त्यावेळी रस्त्याने शेजारी राहणाऱ्या काजल पवार यांनी पत्रा वाजल्याचे कारणावरुन दिनकर चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्याचवेळी त्या ठिकाणी सुनिल पवार हा व त्याची पत्नी कविता पवार हेही त्याठिकाणी आले व त्यांनीही दिनकर चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी दिनकर चव्हाण व सुनिल पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी सुनिल पवार याने दिनकर चव्हाण यांना धक्काबुक्की केली त्यानंतर सुनिल पवार याने दिनकर चव्हाण यांच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बादली मारुन शिवीगाळ केली. त्यावेळी दिनकर चव्हाण यानी तेथे असणारे पातेले उचलून सुनिल पवारच्या दिशेने फेकून मारले. त्यानंतर सुनिल पवार याने ऊसाच्या ट्रॉलीस लावणेचा लाकडी बांबू उचलून दिनकर यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी दिनकर चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबियांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सोमवारी त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.