सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयाजवळ शुक्रवारी रात्री भरधाव कार दुभाजकावर आदळून तिघेजण जखमी झाल्याची थरारक अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर कारने पेट घेतला मात्र, घटनास्थळी धावलेल्या जागरूक नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करत तिघांना कारमधून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात कारमधील सागर गाडे (रा. गुरुवार पेठ, सातारा), शुभम पवार (रा. करंजे पेठ, सातारा), आणि साहील जमादार (रा. बुधवार नाका, सातारा) हे तिघेजण जखमी झाले आहेत. हे तिघे रात्री राजवाड्यावरून फियाट कंपनीची लिनिया कार क्र (MH 12FU1066) या कारने पोवई नाक्याकडे जात असताना हा अपघात घडला. कार चालक साहील जमादार याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर धडकली. जोरदार आवाज व धडकेनंतर कारने पेट घेतल्याचे पाहून नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत तिघांना बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे कारचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र, या अपघाताने येथील रस्त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हवालदार जयवंत कारळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.