सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यात पाचगणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विठ्ठलवाडी (कुसगाव) डोंगराळ परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. येथील गावठाण वस्तीत घुसून गोठ्यातील तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने यापूर्वीही एका कुत्र्याला आणि चार शेळ्यांना आपले भक्ष बनवले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, वाई तालुकयातील पाचगणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विठ्ठलवाडी (कुसगाव) डोंगराळ परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावरत असलेल्या बिबट्याने लोकवस्तीत रात्री घुसून शेतकरी संपत गणपत गोळे यांच्या तीन शेळ्या ठार केल्या. यापूर्वीही बिबट्याने येथील शेळ्या व कुत्रे ठार केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी वनविभागाकडे मागणी केली होती. मात्र, शेतकरी, ग्रामस्थांच्या मागणीकडे वन विभागाकडून लक्ष दिले गेले नाही. परिणामी बिबट्याने पुन्हा तीन शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.
वास्तविक पाहता विठ्ठलवाडी हे पाचगणीच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे गाव आहे. आजूबाजूला दाट झाडीचा डोंगराळ भाग आहे. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने आतापर्यंत आठ ते दहा शेळ्या व कुत्रे डोंगरात व गावठाण वस्तीत घुसून ठार केल्या आहेत. वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याचा वन विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.