कराड प्रतिनिधी | चचेगाव, ता. कराड नजीक कराड – ढेबेवाडी मार्गावर महामार्ग पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका कार दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच कार चालकाने रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकल्याची घटना रविवारी घडली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तीन कॅन संशयास्पदरित्या आढळून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार, दि.17 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलीस मदत केंद्र, कराडचे पोलीस हवालदार सचिन पाटील, सचिन चव्हाण, विकास साळुंखे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना चचेगाव नजीक कराड-ढेबेवाडी मार्गावर ढेबेवाडीबाजूस दुभाजकाला धडकून एका कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली.
हवालदार सचिन पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना पाहताच संबंधित कार चालकाने रस्त्या लागत असलेल्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली. संबंधित कार चालक हा सराईत गुन्हेगार असून याचे नाव राजेंद्र हजारे (रा. उंब्रज, ता. कराड) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे 3 लिटरचे 3 कॅन आढळून आले. पोलिसांनी कारसह डिझेलचे कॅन जप्त केले आहेत.